वामन हरी वाटमारे
![]() |
| वामन हरी वाटमारे |
फार फार वर्षंपूर्वीची गोष्ट आहे ही, एक कोकणातील
गाव आहे, गावाचे नाव आहे ताम्हणकर वाडी, निसर्गरम्य गाव चारही बाजूंनी उंच डोंगर, आणि डोंगराच्या मध्ये खाडी तिचा उगम खारेपाटण या गावातून झाला आणि शेवट विजयदुर्गला
झाला. शेवट झाला म्हणण्या पेक्षा अरबी समुद्राला जाऊन
मिळाली.
ताम्हणकर वाडी हे सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी कुशीत वसलेले आहे, गावच्या वेशीला लागूनच खाडी असल्याने या गावाला एक वेगळेच महत्त्व आले आले. खाडीतील ताजे मासे रोज इथल्या गावकऱ्यांना खायला मिळतात. नारळी पोपळीची
झाडे सुध्दा आहेत, शिवाय हापूस आंब्याच्या बागायती पुष्कळ
आहेत येथे या गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी
जोडधंदा म्हणजे आंब्याचा व्यापार , म्हणजे मोठं मोठे बागाईत
दार तर आहेतच येथे, पण छोटे छोटे बागायत दार सुध्दा आहेत.
असो.
ताम्हणकर वाडी या गावात दयाळ आणि दमयंती नावाचे जोडपे राहत होते. लग्न होऊन फार दिवस झाले नसल्याने त्यांना मूलबाळ इतक्या लवकर होण्याची शक्यता नव्हती. दयाळ हा दिसायला फार सुंदर नसला तरी देखणा होता. उंची साधारण पाच फूट तीन इंच असेल. गरुडाच्या चोचे सारखे नाक, गालावर एक टीट लावल्या सारखा काळा तीळ, केस कुरळे त्यामुळे तो केसात फणी च घालीत नसे, त्या मानाने दमयंती फार सुंदर होती. गोरी गोमटी, उंची साधारण पाच फूट असावी, म्हणजे उभी राहिली तर दयाळ च्या खांद्याला तिचे डोके लागत असे. केस लांसडक , कमरेपर्यंत , ती चालायला लागली की तिची वेणी तिच्या नितंबावर पडत असे.गोल चेहरा, आणि हसली की तिच्या गालाला खळी पडत असे. भाळी मोठे कुंकू लावत असे. आणि भांगात सिन्दुर भरत असे. स्वभाव पण गोड होता. सगळ्यांशी कशी मिळून मिसळून वागत असे. कुणाशी भांडण नाही किंवा तंटा ही नाही. त्याच गावात तिची नणंद सुध्दा राहत होती. म्हणजे गावातल्या गावातच दिलेली.
राजा रानी चा सुखी संसार होता त्यांचा. पण त्यांच्या या सुखी
संसाराला कुणाची नजर लागली ती कोण जाणे ! झाले असे
की , झाले असे दमयंती आपल्या माहेरी गेली होती. म्हणजे
तिचा भाऊ तिला न्यायला आला होता. आत्ता घरी राहिला फक्त
दयाळ मग एकट्या साठी घरी जेवण कोण बनविणार , नाही का ? पण त्याची मोठी बहीण त्याच गावात दिली असल्याने
तो जेवायला तिच्या घरी जाई ! जेवण केल्या नंतर तो आपल्या
घरी केवळ झोपायला येत असे. असा त्यांचा नित्यक्रम सुरू
होता. पण एक दिवस शेतात काम करायला गेला असता तो
पावसात भिजला त्यामुळे त्याला थंडी भरून ताप आला.
घरी आल्यावर त्याने सरळ अंथरूण घातले आणि पांघरून
घेऊन झोपी गेला तो सकाळ झाली तरी उठलाच नाही. अंथरूनावर पडून होता. उठण्याची हिम्मत नव्हती.अथवा
उठून बसण्यासाठी त्याच्या अंगात त्राणच नव्हता म्हणानात.
बायको माहेरी गेलेली अश्या परिस्थिती मध्ये त्याची काळजी
घेईल तरी कोण ? बहीण आहे पण तिला जाऊन सांगणार तरी कोण ? काय करावे ते सुचत नव्हते त्याला. तो तसाच पडून
राहिला.
दुपार झाली जेवणाची वेळ टळून गेली तरी आपला भाऊ
जेवायला सुध्दा आला नाही. कदाचित वहिनी ला आणायला
तो तिच्या माहेरी गेला असावा. असा विचार करून गप्प राहिली.
तो दिवस गेला आणि दुसरा दिवस उजाडला. पण तरी देखील
त्याचा पत्ता नाही की सांगावा नाही. म्हणून ती आपल्या नवऱ्याला म्हणाली," रात्र झाली आहे, नाहीतर मीच गेली असते. जरा तुम्ही माझ्या भावाच्या घरी जाऊन येता का ?
म्हणजे नुसते बघून या घरी की नाही तो." त्यावर तिचा नवरा
म्हणाला ," सकाळी जाऊन बघून येतो की आत्ता रातच्या ला
एखाद्या च्या घरी जायला बरं वाटतं का ?" त्यावर माला चिडून
म्हणाली," एखाद्या घरी नाही माझ्या माहेरी जाऊन यायचं आहे.
फक्त बघून या. घरी आहे की नाही तो ?" माला म्हणजे मालती
बाई वय साधारण तीस पस्तीस असेल, वर्ण निम गोरी , केस
कुरळे, बसके नाक, काळे डोळे, आणि उजव्या गालावर
ओरखडा काढलेल्या सारखी एक जखमेची खूण बालपणी खेळताना पडली. त्याची आठवण म्हणून कपाळा वर जखमेची कायम खूण राहिली. स्वभाव खट्याळ ह्याची त्याची टिंगल टवाळी करण्यात मजा येते. त्या उलट तिचा भाऊ दंगा मस्ती नाही की कुणाची टिंगल टवाळी करणे नाही. बोलणं पण फार कमी जेवढ्यास तेवढे आणि तिचा नवरा मिजास खोर स्वतःचेच खरे करणारा दुसऱ्याना कमी लेखणारा. वय अंदाजे पस्तीस ते चाळीस असावे. उंची सहा फूट शरीराने ही मजबूत पेहलवान जणू ! " पण तो काही गेला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र माली
स्वतः आपल्या भावाला बघायला गेली तेव्हा तिला समजले
की आपला भाऊ दोन तापाने फडफडला आहे , आणि त्याची
देखभाल करायला घरात कुणी नाही. मग वैद्याला निरोप पाठवून बोलवून घेतले आणि त्याला दवा पाणी करायला
सांगितले. वैद्याने तपासले आणि मात्रा दिली आणि त्याची
नीट काळजी घ्यायला सांगितली. आता तिच्या पुढे मोठा
प्रश्न उभा राहिला. नीट काळजी घ्यायची म्हणजे ह्याच्या सोबत
कुणीतरी पाहिजे. आपण जास्त वेळ इथं थांबू शकत नाही.
आणि ह्याला आपल्या घरी नेऊ शकत नाही. कारण आपली
सासू फार काजाक आहे. मग आत्ता काय करावं ? असा विचार
करत असता तिला एकदम जाणवले की , माहेरी गेलेल्या ह्याच्या बायकोला बोलावून घ्यावे. पण कसे कोण जाणार
तिला सांगावा द्यायला. असा विचार सुरू असतानाच तिला
तिच्या जिवलग मैत्रिणी ची आठवण झाली. शेवंती ह्याच गावची
पण तिला दिले आहे, वहिनीच्या गावाला आणि ती सध्या आपल्या माहेरी आली आहे, आणि तिला न्यायला तिच्या सासरची माणसे आली आहेत. तिच्या कडेच निरोप पाठवते
असा निश्चय करून ती तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली,
" शेवंती माझं एक काम करशील का ?" त्यावर ती हसून
म्हणाली," अग हे काय विचार ने झालं ? सांग ना काय सांगायचं
काम ते तुला." तेव्हा माली म्हणाली," शेवंता , माझी वहिनी
माहेरी गेली आहे, तिला फक्त निरोप द्यायचा आहे."
" काय निरोप आहे ?"
माझा भाऊ म्हणजे तिचा नवरा फार आजारी आहे, तेव्हा
असशील तशी निघून ये."
" बस एवढेच ना ? देईन की वाटेतच आहे त्यांचं घर."
" येवढे माझं काम कर, मी तुझे उपकार विसरणार नाही."
" अग ह्यात उपकार कसले ? गरजेला एकमेकांना मदत
करायची नाहीतर काय फायदा आपण मनुष्य जन्म घेऊन.
तेव्हा तू चिंता करू नकोस. मी देईन तुझ्या वहिनीला निरोप."
त्यानंतर परत भावाच्या घरी आली आणि तिने त्याला सांगितले
की , मी निरोप पाठवला आहे, तुझ्या बायकोला संध्याकाळ
पर्यंत येईल ती. आणि संध्याकाळच्या ला मी देखील एक फेरी
मारून जाईन की." असे आश्वासन देवून माली आपल्या घरी
गेली. ठरल्या प्रमाणे शेवंती ने दमयंती च्या माहेरी निरोप दिला.
तेव्हा दुपारचा एक वाजला होता.
निरोप मिळताच दमयंती च्या पाया खालील जमीनच सरकली. नवऱ्याच्या काळजी पोटी ती आपल्या आईला
म्हणाली," आई, मला जायला हव ग ?" त्यावर तिची आई
म्हणाली," बरोबर आहे तुझं. तू जा आपल्या घरी पण तुझ्या
सोबत कुणीतरी हवंय ना ? तुझ्या दादाला शेतावरून येऊ दे
घरी मग त्याच्या सोबत जा." त्यावर दमयंती म्हणाली," अग
आई , दादा शेतावर नाही तर तालुक्याच्या गावाला गेला आहे.
तो संध्यााळ शिवाय येणार नाही. आणि मी एवढा वेळ इथ थांबू
शकत नाही. मला ताबडतोब निघायला हवं "
" अगं पण तू एकटी जाणार कशी ? आधीच दुपार झाली आहे
शिवाय जंगल चा मार्ग आहे. "
" अगं जंगल असलं म्हणून काय झालं ? कोण येतंय तिथं
मला खायला."
" असं वेड्यागत बोलू नये. कधी काय होईल ते सांगता येईल
का ? म्हणून म्हणते आज नको जाऊस उद्या जा तुझा दादा तुला
सोडायला येईल तुझ्या घरी !"
" आई , माझा नवरा फार आजारी आहे गं , मी उद्याची वाट
नाही पाहू शकणार , मी आताच निघते. माझी चिंता करू नकोस
तू . अगं मी कित्येक वेळा त्या रस्त्याने गेली आहे. एकदम
सुनसान आहे , पण घाबरण्याचे काही कारण नाहीये."
" ठीक आहे , जा मग पण सांभाळून. लेकी माझा जीव नाही
होत गं तुला एकटी ला पाठवायला."
" आई , तू उगाचच चिंता करतेस. मी कित्येक वेळा त्या रस्त्याने गेली पण आहे आणि आली पण आहे."
" असे म्हणतेस तर मग जा ! पण पोहोचल्या पोहोचल्या
कोणाकडे तरी निरोप पाठव. म्हणजे माझी चिंता दूर होईल."
" बरं बरं पाठवते हा निरोप !" असे म्हणून तिने झटापट
तयारी केली आणि निघाली पण गावची वेश संपली आणि
जंगल चां रस्ता सुरु झाला.
भयानक घनदाट अरण्य आणि अरण्य म्हटले म्हणजे त्यात
जंगली श्यापदे ही असणारच. वाघ , सिंह , हत्ती , सांबार असे
अनेक जंगली प्राणी ! तसे दिवसा फारसे दृष्टीस पडत नाहीत
ते. त्याचे कारण दिवस हा माणसांसाठी असतो आणि रात्र ही
प्राण्यांसाठी असते. दिवसा माणसांच्या भीतीनं जंगली प्राणी
आपल्या ढोलीत लपून बसतात. जशी माणसांना जंगली प्राण्यांची भीती वाटत असते. तशी प्राण्यांना ही माणसांची
भीती वाटत असते. त्यामुळे दिवसा शक्य तो ते आपल्या ढोली तून बाहेर पडतच नाहीत. आणि पडलेच कुणी बाहेर तर
माणसा समोर उभे राहत नाही. धूम पळून जाते. आणि माणसे
सुध्दा जंगल च्या मार्गाने जायचे असेल तर एकटे दुखटे जात
नाहीत. सोबत कुणाला तरी घेतातच किंवा सोबत बदुंक सुध्दा
असते. दिसलाच कुणी तर हवेत फायर करून त्याला पळवून
लावायचे.
" जंगल एकदम घनदाट होते. दिवसा कुणी एकटा दुखटा
फिरकत नसे. त्या जंगलातून केवळ एक पाय वाट होती. आणि
आजूबाजूला काटेरी झाडे झुडपे होती. वेली वृक्षांनी नटलेले
जंगल होते ते. सूर्याचा प्रकाश ही भूमीवर पुरेसा पडत नसे.
अश्या जंगलाच्या मार्गाने जायचे म्हणजे फारच डेटिंगबाज
माणूस असायला पाहिजेल. अशा भयानक घनदाट जंगलातून
दमयंती ला जायचे होते. दमयंती इकडे तिकडे पाहत जंगली
प्राण्याचा कानोसा घेत हिमतीने एक एक पाऊल पुढे टाकत
निघाली. मध्येच कुणीतरी सळसळत गेल्याचा आवाज होई
आणि दमयंती च्या अंगावर भीतीने काटा उभा राही. मध्येच
कुणी ससा ., कुणी सांबार इकडून तिकडे पळत गेल्याचे दिसे.
तोच समोरून वाघ येताना दिसला. आत्ता काय करावे ? वाघ
आपल्याला काही जिता सोडणार नाही. आईचे ऐकायला हवे
होते. उगाच आलो आपण आता हा वाघ आपल्याला सोडत
नाही. मागे ही पळू शकत नाही. वाघ एका उडी मध्येच आपल्याला गाठेल. काय करावं ? तिच्या डोळ्या समोर अंधार दाटला. वाघ आपल्याला कसा खाईल हे बघण्या पेक्षा आपण
डोळेच मिटून घेऊ !"असा विचार करून तिने डोळे गपकन
मिटून घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा